जेटली याच्या घरात सेहवागला पडली होती लग्नाची बेडी


टीम इंडियाचा माजी कप्तान आणि धुवाधार फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते दिवंगत अरुण जेटली यांची एक अनोखी आठवण जागवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सेहवाग याने पत्नी आरती हिच्यासोबत सात फेरे अरुण जेटली यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानात घेतले होते. जेटली यांचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले आणि रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. तेव्हापासून जेटली यांना समाजाच्या प्रत्येक स्थरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

अरुण जेटली यांना क्रिकेटविषयी विशेष प्रेम होते. त्यांनी डीडीसीएचे अध्यक्षपद अनेक वर्षे सांभाळले होते. २००४ मध्ये कायदा मंत्री असताना जेटली दिल्लीत ९, अशोक रोड येथे सरकारी निवासस्थानात राहत होते. येथेच सेहवागचे आरती बरोबर २२ एप्रिल २०१४ रोजी लग्न लागले होते. हे लग्न सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात झाले होते आणि तेथे मिडियाला प्रवेश नव्हता. इतकेच काय लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा ओळखपत्र दाखवूनच आत प्रवेश दिला गेला होता.

सेहवाग ट्विट करताना म्हणतो, जेटली यांच्या जाण्याने खूप दु:ख झाले आहे. दिल्लीच्या क्रिकेटपटूना भारतीय संघाचे नेतृत्व करायला मिळावे यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आणि या प्रकरणात महत्वाचची भूमिका बजावली होती. खेळाडूंच्या अडचणी ते शांतपणे ऐकून घेत आणि त्या सोडवत असत. त्यांची आठवण कायम राहील.

Leave a Comment