भारताने आता पीओके ताब्यात घ्यावे – स्वामी

भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. चंदीगड येथे बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1947 ला युनायडेट नेशन्स सिक्युरिटी काउंसिलमध्ये याचिका दिली होती. पंतप्रधान मोदींनी ही याचिका मागे घेतल्यानंतर लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच एलओसी अवैध होईल आणि भारतीय सैन्याला पीओकेमध्ये प्रवेश करता येईल. भारतीय सैन्य मुजफ्फराबादपर्यंत पोहचेल व पीओकेवर सहज कब्जा करेल, असे विधान त्यांनी केले आहे.

स्वामी डीएवी कॉलेजच्या वेकेशन ऑफ पीओकेवर आयोजित राष्ट्रीय सेमिनारमध्ये बोलत होते. ते म्हणाले की, पाकिस्तान आताही नाही सुधारला, तर येणाऱ्या काळात पाकिस्तानचे चार तुकडे होतील.

स्वामी यांनी पंतप्रधान मोदींना सुचवले की, भारताने संयुक्त राष्ट्रामधील याचिका परत घेण्यावर काम केले पाहिजे. जेणेकरून पीओकेवर ताबा मिळवता येईल. देश स्वातंत्र्य झाल्यावर तत्कालीन सरकारने काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्र संघात नेला होता. मध्यस्थी करण्याची वेळ आली तेव्हा संयुक्त राष्ट्राने जो हिस्सा भारताच्या ताब्यात होता तो भारताला आणि जो पाकिस्तानकडे होता तो पाकिस्तानला दिला.

स्वामी म्हणाले की, माझे गोत्र कश्यप आहे. काश्मीरला कश्यप लोकांनी वसवले होते. त्यामुळे काश्मीरबरोबर माझे जुने नाते आहे. काश्मीरमधील कलम केवळ राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने देखील हटवले जाऊ शकत होते व सरकारने असेच केले.

Leave a Comment