रेल्वेपासून ते विमानतळापर्यंत आता तुमचा आवडता चहा मिळणार ‘कुल्हड’मध्ये

आता लवकरच मुख्य रेल्वे स्टेशन, बस डेपो, विमानतळ आणि मॉल्समध्ये चहा इकोफ्रेंडली कुल्हडमध्ये देण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय परिवहन आणि एमएसएमई मंत्री नितिन गडकरींनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. सध्या केवळ वाराणसी आणि रायबरेली रेल्वे स्टेशनवरच टेराकोटाचे बनलेले कुल्हड, ग्लास आणि प्लेट्सचा वापर करण्यात येत आहे.

नितिन गडकरींनी सांगितले की, त्यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. गडकरी यांनी 100 रेल्वे स्टेशनवर कुल्हडचा वापर करण्याविषयी सांगितले आहे. त्याचबरोबर विमानतळ, राज्य परिवहन निगमचे बस स्थानक या ठिकाणच्या चहाच्या दुकानांवर कुल्हडचा वापर अनिवार्य करण्यास सांगितले आहे. तसेच मॉल्समध्ये देखील कुल्हडमध्ये चहा देण्यास दुकानाच्या संचालकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

याद्वारे कुंभारांचा बाजार वाढेल व पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास देखील मदत होईल. यामुळे प्लॅस्टिक आणि पेपरच्या पेय पदार्थांवर देखील बंदी येईल. गडकरींनी सांगितले की, खाद्य आणि ग्रामोद्योग आयोगाला कुल्हडची मागणी वाढण्यासाठी यासंबंधी उत्पादन वाढवण्यासाठी जरूरी यंत्र देण्यात यावे,

केवीआयसीचे चेअरमन विनय कुमार सक्सेनाने सांगितले की, मागील वर्षी कुल्हड बनवण्यासाठी कुंभाराना 10 हजार मातीची भांडी बनवणाऱ्या चाकाचे वितरण करण्यात आले होते. यावर्षी 25 हजार इलेक्ट्रिक चाक देण्यात येतील.  2004 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री यांनी कुंभार व्यवसाय वाढण्यासाठी रेल्वे आणि रेल्वे स्टेशनवर कुल्हडचा वापर सुरू केला होता.

Leave a Comment