अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास


आपण घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असताना जर आपल्या आसपास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक खराब झाली, तर त्यासाठी प्रसंगावधान राखून पुढील उपाययोजना करणे अतिशय आवश्यक असते. वेळीच उपचार केले गेल्याने परस्थिती आटोक्यात येते. पण काही विकार अगदी अचानक उद्भवतात. हे विकार गंभीर स्वरूपाचे असल्याने आणि यासाठी करावयाच्या उपचारांबद्दल फारशी माहिती नसल्याने प्रसंग हाताबाहेर जातो, आणि हा विकार उद्भवलेल्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकते. अचानक कोणाला आलेला हृदयविकाराचा झटका हे अश्या प्रसंगाचे उदाहरण म्हणता येईल.

आपल्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास, त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत काही उपाय आपण करू शकता. या करिता स्वतः घाबरून न जाता, आपल्या आसपासच्या इतर व्यक्तींना आपल्या मदतीकरिता बोलावून घ्या. वैद्यकीय तज्ञांना, रुग्णवाहिकेला बोलावून घेण्यासाठी ताबडतोब फोनद्वारे निरोप द्या. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला जमिनीवर सरळ झोपवा. त्याच्या शरीरावरील कपडे, बेल्ट इत्यादी घट्ट वस्तू सैल करा. हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती शुद्धीत आहे किंवा नाही हे पाहावे. जर व्यक्ती बेशुध्द असेल, तर त्याच्या नाकाजवळ आपला हात नेऊन त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे किंवा नाही हे तपासावे.

रुग्णाची पल्स तपासावी. जर त्याचा श्वासोच्छ्वास होत नसेल, किंवा पल्सही लागत नसेल, तर अश्या वेळी रुग्णाला सीपीआर देण्याची आवश्यकता असते. सीपीआर देण्यासाठी आपला उजवा हात रुग्णाच्या छातीच्या मधोमध ठेऊन उजव्या हातावर डावा हात ठेवावा, व दोन्ही हातांनी पूर्ण प्रेशरने छाती दाबावी. या प्रक्रियेला कम्प्रेशन असे म्हणतात. हे प्रक्रिया जलद गतीने करायची असते. एका मिनिटांमध्ये शंभर कम्प्रेशन्स या गतीने ही प्रक्रिया करावयची असते. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment