अरुण जेटली पंचत्वात विलीन

माजी केद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अरूण जेटली यांचे शनिवारी रात्री निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मागील दोन आठवड्यापासून ते हॉस्पिटलमध्ये भर्ती होते. आज दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारावेळी सर्व केंद्रीय मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि कपिल सिब्बल देखील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बहरिनच्या दौऱ्यावर असल्याने ते यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत.

अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेला त्यांच्या घरापासून, नंतर भाजपा मुख्यालयातून सुरूवात झाली. यावेळी उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा, अजित सिंग आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे देखील उपस्थित होते.

अरूण जेटली अर्थमंत्री असताना, त्यांच्या काळात नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर यासारखे अनेक महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले होते. याआधी माजी केंद्रीय मंत्री सुष्मा स्वराज यांचे देखील 6 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. तसेच भाजप नेते आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचेही मार्चमध्ये निधन झाले होते.

Leave a Comment