चोराने गिळलेली सोन्याची साखळी बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल


आपली चोरी लपवण्यासाठी चोराने किती डोके लढवले तरी त्याच्याकडून काही ना काही ही चुक होतेच. पण त्याच चोरीचे सत्य बाहरे काढण्यासाठी पोलिसही कोणती कसर ठेवत नाही आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. सध्या अशीच काहीशी घटना समोर आली आहे. पण राजस्थान बीकानेरमधील ही घटना थोडी मजेशीर आहे. तेथील पोलिसांना पाहून एका चोराने चक्क सोन्याची चैनच गिळली. पण आता त्यात पोलीस देखील कमी नव्हते. ती सोन साखळी बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन चोरांनी २० ऑगस्ट रोजी एका महिलेची सोन साखळी हिसकावून घेतली. पोलिसांनी चोरांना चोरीच्या काही तासांनंतर लगेच अटक केली. चोरांची सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ओळख पटली होती. पण पोलिसांनी जसेही दोघांना पकडले त्यातील एकाने सोन्याची साखळी गिळली.

ज्याने हा कारनामा केला त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. एक्स-रे काढल्यावर त्यात सोन्याच्या साखळीचे तुकडे आढळले. आता ही साखळी कशी काढायची असा प्रश्न पडला असताना एंडोस्कोपिक सर्जरीऐवजी डॉक्टरांनी पोटॅशिअमयुक्त पदार्थ खाऊ घालण्याचा सल्ला दिला. त्या चोराला पोलिसांनी लगेच एक डझन केळी आणि दोन पपई खाऊ घातल्या. दोन दिवसांनी २२ ऑगस्टला सकाळी पोलिसांचे मिशन फत्ते झाले आणि चोराच्या विष्ठेतून सोन्याची साखळी बाहेर आली.

Leave a Comment