भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन


नवी दिल्ली – आज 24 ऑगस्ट रोजी 12 वाजून 7 मिनिटांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली हे प्रदीर्घ काळ प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही त्यांच्यावर करण्यात आली होती.

त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. प्रसारमाध्यमांतून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त येत होते. दरम्यान, जेटली यांच्यावर उपचार करणाऱ्या एम्सच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जारी करत जेटली यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. पण सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले होते की, जेटली यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.

मधुमेहानेही अरुण जेटली हे त्रस्त होते. किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली होती. त्यांना काही दिवसांपूर्वीच सॉफ्ट टिशू कॅन्सर झाल्याचेही निदान झाले होते. लठ्ठपणापासून त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी बैरिएट्रिक सर्जरीही केली होती. जेटली यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एम्समध्ये दाखल झाले होते.

केंद्रामध्ये एनडीए प्रणीत भाजप सरकार 2014 मध्ये सत्तेवर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. 2019 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आल्यावरही ते दुसऱ्यांदा सरकारमध्ये सहभागी होऊ शकत होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण ओळखून जेटली यांनी स्वत:हूनच स्वत:ला सक्रिय राजकारणापूस अलिप्त करुण घेतले. तसेच, पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून प्रकृतीअस्वास्थ्याचे कारण देत आपला समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करु नये अशी विनंतीही जेटली यांनी केली होती. त्यांच्या जाण्याने भाजपमध्ये तीव्र दु:ख व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment