FATF ने ठेचल्या पाकिस्तानच्या नांग्या; टाकले काळ्या यादीत


नवी दिल्ली – दहशतवादाचा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका बसला असून दहशतवादी रसदेवर करडी नजर ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) एशिया पॅसिफिक ग्रुपच्या APG गटाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओढवलेली ही मोठी नामुष्की आहे. आधीच कर्जाचा डोंगर असलेल्या पाकिस्तानवर ओढवलेली ही नामुष्की आहे.

यासंदर्भात पीटीआयला भारतीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला एशिया पॅसिफिक अर्थात एपीजी गटाने काळ्यात यादीत टाकले आहे. पाकिस्तान आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्यासंबंधीचे जे मापदंड आहे त्यातल्या ४० पैकी ३२ निकषांवर अपयशी ठरला असल्यामुळे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. पाकिस्तानला गेल्या वर्षी ग्रे यादीत टाकण्यात आल्यानंतर कृती आराखड्यानुसार काम करण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले होते. पण पाकिस्तान त्यात सपशेल अपयशी ठरल्यामुळेच पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. पाकिस्तानाला आता ऑक्टोबर २०१९ पर्यंत काळ्या यादीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हा मोठा झटका आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था APGच्या निर्णयावर जर FATFने शिक्कामोर्तब केले तर रसातळाला जाईल. जगातील इतर देश आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था पाकिस्तानला कर्ज देणे पूर्णतः थांबवतील. गुंतवणूक पाकिस्तानात केली जाणार नसल्यामुळे त्यांच्या उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला देशांतर्गत परिस्थिती सांभाळणे कठीण होऊन बसले आहे.

ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामध्ये APGची ही वार्षिक बैठक पार पडली. या संस्थेने टेरर फंडिंग रोखण्यासाठी पाकिस्तानच्या म्युच्युअल इव्हॅल्युएशन अहवालाचे या बैठकीत परिक्षण केले. यावेळी पाकिस्तानने टेरर फंडिंग रोखण्यासाठी उचलत असलेल्या पावलांची येथे माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण APGचे या युक्तीवादाने समाधान झाले नाही. APGने उचललेल्या या पावलांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ होणार असून त्यामुळे जगात हा स्पष्ट संदेश जाणार आहे की, टेरर फंडिंगमुळे पाकिस्तानकडून जगाला धोका आहे.

Leave a Comment