नवऱ्याच्या अतिप्रेमाला कंटाळून पत्नीने केली घटस्फोटाची मागणी


सर्वसामान्यपणे जोडपी त्यांच्यातील दुराव्यामुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतात. त्याचबरोबर अनेकजण घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत एकमेकांसोबत न पटल्यामुळे आणि नात्यातील प्रेम कमी झाल्यामुळे पोहोचतात. पण एखादा नवरा आपल्या बायकोवर अतोनात प्रेम करतो म्हणून घटस्फोटाची मागणी केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण अशी घटना संयुक्त अरब अमिरातीमध्ये खरोखर घडली आहे. आपला पती आपल्यावर अतोनात प्रेम करतो आणि त्याच्या या अतिप्रेमामुळे आपल्याला गुदमरल्यासारखे वाटत असल्याने तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भातील वृत्त खलीज टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने फुजैराहमधील शरिया न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ती महिला घटस्फोटाचे कारण देताना म्हणाली की, माझा नवरा माझ्यावर कधीच ओरडला नाही किंवा माझे म्हणणे कधीही नाकारले नाही. तो मला घर कामातही मदत करतो. त्याच्या अशाच वागण्याने मला गुदमरल्यासारखे वाटत आहे.

आपला नवरा आपल्यासाठी कधी तरी स्वयंपाकही करायचा. नेमक्या या सर्व गोष्टी तिला नरक यातना देत होत्या. तिने त्यामुळेच वर्षभराचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या लग्नाबद्दल बोलताना ती म्हणाली की, मी भांडणाची एक दिवस आतुरतेने वाट पाहत होते. पण त्याने मला सहज माफ केले आणि भेटवस्तूही दिल्या. मला माझ्या आयुष्यात फक्त आज्ञाधार नवरा नको असून प्रेम, भांडण, संवाद या सगळ्या गोष्टी हव्या आहेत.

नवरा आपल्या बायकोच्या या आरोपांवर आपले मत स्पष्ट करताना म्हणाला की, मी काहीही चुकीचे केले नाही. मला फक्त माझ्या बायकोला आनंदी ठेवायचे होते आणि एक परिपूर्ण नवरा व्हायचे होते. त्याचबरोबर बायकोने त्याचे वजन वाढल्याची तक्रार केल्यानंतर त्याने डाएट आणि जीम सुरू केले. सध्या हे प्रकरण न्यायालयाने लांबणीवर टाकले असून नवऱ्याने न्यायालयाकडे बायकोला समजावण्याची विनंती केली असून तिला केस मागे घेण्याची विनंती केली आहे.

Leave a Comment