बिग बीच्या करोडपती मध्ये सिंधुताई सपकाळ


हजारो अनाथ मुलांची माउली बनलेल्या सिंधुताई सपकाळ अमिताभ बच्चन संचालन करत असलेल्या लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती सिझन ११ मध्ये या आठवड्यात कर्मवीर स्पेशल एपिसोड मध्ये सहभागी होत आहेत. हा शो शुक्रवारी होत असून त्याचे प्रोमो रिलीज केले गेले आहेत.

प्रोमो मध्ये सिंधूताईंचे स्वागत करताना बिगबी त्यांना वाकून नमस्कार करताना दिसले आहेत. यात सिंधुताईंच्या समाजकार्याची डॉक्यूमेंटरी दाखविली गेली आहे. घासातला घास आणि श्वासातला श्वास देऊन सिंधुताईनी १२०० अनाथ मुलांचा सांभाळ आईच्या मायेने करण्याचे महान कार्य केले आहे.

अमिताभ यांनी या शो मध्ये सिंधुताईना तुम्ही नेहमी पिंक कपडे का वापरता असे विचारल्यावर अतिशय तल्लख विनोद बुद्धी आणि हजरजबाबी सिंधुताई सांगतात आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक काळे, अंधारे दिवस पहिले आता बाकी आयुष्य गुलाबी असावे असे वाटते. लहान वयात लग्न झालेल्या सिंधुताईना नवरा आणि सासरच्या लोकांनी लहान मुलीसह घराबाहेर काढले होते आणि त्यातूनच त्यांना अनाथ मुलांना सांभाळण्याची प्रेरणा मिळाली आणि हे महान कार्य त्यांच्या हातून झाले.

सिंधुताईना आजपर्यंत ७५० हून अधिक विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्या सांगतात, नवऱ्याने मला घराबाहेर काढले पण मला मिळालेली प्रतिष्ठा पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. अर्थात त्याने घराबाहेर काढले नसते तर हे काम माझ्या हातून घडले नसते याची जाणीव ठेऊन मी त्यांना माफ केले आणि आज त्यांचा माझ्या अन्य मुलांप्रमाणे सांभाळ करते आहे.

Leave a Comment