पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला, २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी


नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणात बुधवारी रात्री अटक केल्यानंतर आज त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआय न्यायालयाने यावेळी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने न्यायालयात युक्तीवाद करत असताना चिदंबरम यांची पाच दिवसांची कोठडी मागितली होती.

सीबीआय न्यायालयात पी चिदंबरम यांना हजर करण्यात आल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांची बाजू मांडली. सीबीआयकडून पाच दिवसांची कोठडी मागण्यात येईल अशी चर्चा होती. आता सीबीआय कोर्टाने चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

चिदंबरम यांनी अटक होण्याआधी काँग्रेस मुख्यालयात बुधवारी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले की, मी फरारी आहे, न्यायप्रक्रिया टाळत आहे, असा अपप्रचार पद्धतशीरपणे केला गेला. पण उलट न्यायासाठीच मी गेले २७ तास माझ्या वकिलांशी चर्चा करीत होतो. कायद्याचे पालन करणारा मी असून तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन करावे. माझ्याविरोधात एकही आरोपपत्र दाखल नाही, उलट एका प्रकरणात मला आधीच तपास यंत्रणेकडून निर्दोष जाहीर करण्यात आले आहे. मी, माझा मुलगा किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही भ्रष्टाचार केलेला नाही. शुक्रवारी मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहणार आहे.

Leave a Comment