राज ठाकरे सहकुटुंब चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाला?


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आयएलएफएस घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडी कार्यालयाला रवाना झाले असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावरुन राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सहकुटुंब राज ठाकरे ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे.

सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानातून राज ठाकरे ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्यासोबत यावेळी पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, मुलगी उर्वशी आणि बहिणही हजर आहेत. अंजली दमानिया यांनी यावरुनच ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीका केली. त्या म्हणाल्या की, सहकुटुंब सहपरिवार राज ठाकरे ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.


यासंदर्भात एका वृत्तवाहिनी सोबत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, कशाला हवा एवढा ड्रामा? चौकशीला जाताना कुटुंबाला घेऊन जाणे किती योग्य आहे? ईडी कार्यालयात चौकशीला जाताना एकट्याने जायला हवे, चौकशीला सामोरे जाऊन परत यावे. सरकारविरुद्ध राज ठाकरे बोलत आहेत म्हणून सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे म्हटले जात असले तरी, एवढी अमाप संपत्ती राज ठाकरेंकडे कुठून आली आणि यावर प्रश्न विचारले तर कुठे चुकले ? खरंतर खूप वर्षांपूर्वी हे व्हायला हवे ते आज झाले, त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करते.

केवळ त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांवरच नाही तर भाजपच्या घोटाळेबाज नेत्यांवरही सरकारने कारवाई करावी, असे आवाहन अंजली दमानिया यांनी केले. प्रवीण दरेकर, मुकुल रॉय भाजपमध्ये गेले आणि त्यांच्याविरुद्धची चौकशी बंद झाली. भाजपविरुद्ध बोलणारे किंवा ते भाजपमध्ये जात नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध चौकशी करायची हे चुकीचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment