ट्रम्प यांच्या काश्मीर मध्यस्थीवर ओवेसी म्हणतात, बेगानी शादी में अब्दुला दिवाना


नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याच्या कथित नवीन ऑफरवर टीका करताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी सांगितले की, “बेगानी शादी में ट्रम्प दिवाने हो रहे हैं.” हैदराबादचे खासदार असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी असेही म्हटले की, सरकारचे धोरण स्पष्ट असले पाहिजे आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हे सांगावे की देशाला त्यांच्या भूमिकेची गरज नाही. ओवेसी यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, ट्रम्प म्हणतात की भारत आणि पाकिस्तान यांच्यात मी मध्यस्थी करेन. पुन्हा पुन्हा असेच घडत आहे. ट्रम्प यांचे या प्रकरणाशी काही घेणे देणे नाही, मग ते का म्हणून मध्यस्थी करतील?

ते म्हणाले, काय होत आहे? या देशाचे परराष्ट्र धोरण कोण चालवित आहे? ट्रम्प यांना आपण इतके का घाबरलो आहोत की त्यावर आपल्याला प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाही? सरकारचे धोरण स्पष्ट असले पाहिजे आणि ते स्पष्टपणे सांगावे आपली (ट्रम्प) गरज नाही. ओवेसी यांनी वेगळ्या ट्विटमध्ये बेरोजगारीवरुन भाजपवर निशाणा साधला. यापूर्वी बुधवारीसुद्धा असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केले होते. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरबाबत फोनवर केलेल्या संभाषणानंतर ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संभाषणाबद्दल निराशा व्यक्त करताना असदुद्दीन ओवेसी यांनी निराशा व्यक्त केली. असदुद्दीन ओवेसी यांनी विचारले होते की ट्रम्प हे संपूर्ण जगाचे “पोलिस” आहेत की ‘चौधरी’. ते म्हणाले, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे असे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत. त्याबाबत भारताची भूमिका खूप स्थिर आहे. मग पंतप्रधान मोदींनी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्याची आणि त्याबद्दल तक्रार करण्याची गरज काय होती.

ओवेसी म्हणाले, आमचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काश्मीरप्रश्नी फोनवर बोलले. आमच्यासाठी ट्रम्प काय आहेत? ते संपूर्ण जगाचे पोलिस आहेत की ते चौधरी आहेत? विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर पाकिस्तानशी काश्मीरबाबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलले.

Leave a Comment