यामुळे इटलीमधील ‘या’ बेटावर आहे प्रवेश बंदी


नैसर्गिक सौंदर्यतेसाठी जगभरातील अनेक बेटे प्रसिद्ध आहेत. पण आम्ही आज तुम्हाला इटलीतील एका अशा बेटाबद्दल सांगणार आहोत जे खूपच सुंदर आहे पण यावर प्रवेश बंदी आहे. कारण या बेटाचा जगातील सर्वात धोकादायक बेटांमध्ये समावेश होतो. ‘Island of Dead’ असे इटलीमधील या बेटाला म्हटले जाते.

पोवेग्लिया असे वेनीसिया लेकच्या उत्तरेला असलेल्या या बेटाचे नाव असून येथे जाणे आणि मृत्युला आमंत्रण देणे एकच गोष्ट असल्याचे बोलले जाते. येथे जाणाऱ्याला व्यक्तीला तेथून परत येणे कठिण काम असते. त्यामागे एक भयावह गोष्ट सांगितली जाते. त्यामुळे या बेटावर जाणे लोक टाळतात. तसेच सरकारनेही येथील प्रवेशावर बंदी आणली आहे.

यामागे असे कारण सांगितले जाते की, शेकडो वर्षांपूर्वी या बेटावर प्लेगच्या रूग्णांना शेवटच्या घटका मोजण्यासाठी आणून सोडले जात असे आणि याठिकाणी त्यांचा मृत्यु होत होता त्याचबरोबर त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जायचे. एकेकाळी या बेटावर जवळपास १ लाख ६० हजार रूग्णांना जिवंत जाळले गेले होते. त्यानंतर या बेटावर भूत-प्रेत असल्याची शंका लोकांमध्ये होती.

त्यानंतर १९२२ मध्ये मेंटल हॉस्पिटल या बेटावर उभारण्यात आले. पण ते सुद्धा काही वर्षातच बंद करण्यात आले. यामागे असे कारण सांगितले जाते की, येथे काही विचित्र गोष्टी डॉक्टरांपासून ते रूग्णांपर्यंत सगळ्यांनाच दिसू लागल्या होत्या. हे बेट मेंटल हॉस्पिटल बंद झाल्यानंतर अनेक वर्ष बंद होते. त्यानंतर १९६० मध्ये हे बेट इटली सरकारने एका व्यक्तीला विकले.

असे सांगितले जाते की, त्या व्यक्तीने येथे परिवारासोबत असामान्य घटनांसोबत काही दिवस काढले. तो नंतर बेट सोडून निघून गेल्यानंतर आणखी एक व्यक्ती या बेटावर राहण्यासाठी आली होती. काही विचित्र घटना त्याच्यासोबतही घडल्या आणि ती व्यक्ती सुद्धा तिथून पळाली. तेव्हापासून या बेटावर कुणीच आले नाही. या बेटाजवळ मासे पकडण्यासाठी मासेमारी करणारे लोकही जात नाहीत.कारण अनेकदा त्यांच्या जाळ्यात मेलेलेच मासे फसतात.