पहिले राफेल २० सप्टेंबरला भारतात येणार


फ्रांसच्या दासोल्ट एव्हीएशन कंपनी बरोबर केलेल्या राफेल खरेदी करारातील पहिले राफेल लढाऊ विमान येत्या २० सप्टेंबरला मिळणार असून हे विमान आणण्यासाठी रक्षामंत्री राजनाथसिंग, एअर चीफ मार्शल बी.एस धनुआ यांच्यासह मोठी टीम फ्रांसला रवाना होत आहे. राफेल खरेदी वरून लोकसभेत मोठा हंगामा झाला होता आणि भ्रष्टाचाराचे अनेक आरोप प्रत्यारोप केले गेले होते. गेली कित्येक वर्षे अत्याधुनिक विमानांची भारतीय हवाई दलाला गरज आहे ती या विमानांच्या खरेदीने बऱ्याच अंशी भागणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

राफेल विमाने भारतीय हवाई दल वापरीत असलेल्या सध्याच्या लढाऊ विमानांच्या तुलनेत खूपच अॅडव्हान्स्ड आहेत. या विमानांच्या उड्डाण कौशल्यासाठी भारतीय हवाई दल वैमानिकांना फ्रांसमध्ये प्रशिक्षण दिले जात असून मे २०२० पर्यंत २४ पायलट प्रशिक्षित केले जात आहेत. भारताने फ्रांसच्या कंपनीबरोबर ३६ राफेल खरेदी करार केला असून यासाठी १ अब्ज युरो खर्च केला जाणार आहे. भारतासाठी राफेल विविध तंत्रज्ञानाने युक्त आहे. या विमानांची प्रत्येकी एक स्क्वाड्रन अंबाला, बंगालमधील हशिमारा येथील हवाई दलाच्या विमानतळांवर तैनात केली जाणार आहे.

Leave a Comment