अमेझोनचे सर्वात मोठे ऑफिस हैद्राबादमध्ये सुरु


अमेझॉनने अमेरिकेतील मुख्यालयानंतर जगातील दोन नंबरचे मोठे ऑफिस हैद्राबाद येथे सुरु केले असून बुधवारी या कार्यालयाचे उद्घाटन केले गेले. या कार्यालयात १५ हजार कर्मचारी काम करणार आहेत. साडे नऊ एकर परिसरात सुमारे ४० लाख चौरस फुट बांधकाम येथे केले असून त्यासाठी पॅरीसच्या आयफेल टॉवर उभारणीसाठी जितके पोलाद वापरले गेले त्याच्या अडीचपट पोलाद वापरले गेले आहे. जागेचा विचार करता हा अमेझॉनचा हा जगातील सर्वात मोठा कॅम्पस ठरला आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष जॉन शॉएटलर म्हणाले येथे आठ मोठ्या इमारती बनविल्या गेल्या असून आत्तापर्यंत ४५०० कर्मचारी येथे शिफ्ट झाले आहेत. अमेझॉन मध्ये सध्या भारतभरात ६२ हजार पूर्ण वेळ कर्मचारी आहेत. अमेझॉन इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल म्हणाले, येथील कॅम्पसवर सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, डेव्हलपर, मशीन लर्निंग सायन्टीस्ट, प्रोडक्ट मॅनेजर, फायनान्स व अन्य कामे करणारे कर्मचारी काम करतील. या कॅम्पसवर ३०० हून अधिक झाडे लावली गेली असून त्यातील दोन २०० वर्षे जुनी आहेत. येथे साडेआठ लाख लिटर पाणी रिसायकल करता येणारा प्रकल्प उभारला गेला आहे.

अमेझॉन ग्राहकांना भारतात नव्या सुविधा देण्यावर फोकस करत असून त्यांना वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्ट बरोबर स्पर्धा करावी लागते आहे. कंपनीने भारतात ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून त्यातील बहुतेक गुंतवणूक बिझिनेस सेक्टर मध्ये केली जाणार आहे असेही अग्रवाल म्हणाले.