भाजपमध्ये प्रवेश करणार उदयनराजे भोसले ?


मुंबई: भाजपच्या वाटेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे असल्याची चर्चा असून उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबईत भेट घेतल्यानंतर भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. उदयनराजे भोसलेंचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केल्यानंतर उदयनराजेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपत उदयनराजे भोसले यांनी प्रवेश केल्यास त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार हे निश्चित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर भाजपत प्रवेश करण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान उदयनराजे भोसले यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला? याची चर्चा सर्वत्र होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील उदयनराजे भोसले हे खासदार आहेत. आपल्या खासदारकीचा उदयनराजे भोसले हे राजीनामा देऊन भाजपत प्रवेश करणार आणि त्यानंतर पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

उदयनराजे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उदयनराजेंनी फेसबुक पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात भेट घेऊन पूरग्रस्त भागातील नागरिकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्याबाबत तसेच लवकरात लवकर पंचनामे करुन भरपाई मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली.

Leave a Comment