ईडी चौकशी, उद्धव यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष पाठिंबा


मुंबई : अमंलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी बजावलेल्या नोटीशीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आज मातोश्री येथे ईगतपुरीच्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित आणि करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी गावित आणि बागल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत सामावून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

पत्रकारांनी यावेळी विचारले की, राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहेत, त्यावर तुमचे मत काय आहे. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, काहीही अशा प्रकारच्या चौकशीतून निष्पन्न होणार नाही. अशा शब्दांत आपले चुलत भाऊ आणि राजकीय प्रतिस्पर्धी राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे. विविध प्रश्नावरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेंकावर टीका करताना आपल्या दिसतात. पण या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

यावेळी असे म्हणण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सूपुत्र उन्मेष जोशी यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांची गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. या माध्यमातून शिवसेनेच्या इतर नेत्यांवरही आपण ईडीची चौकशी लावू शकतो हे संकेत द्यायचे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीनंतर अप्रत्यक्ष राज ठाकरेंना पाठिंबा देऊन भाजपला संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment