विंग कमांडर अभिनंदनना पकडणारा पाक कमांडो ठार


वीरचक्र पुरस्कार जाहीर झालेले भारतीय हवाई दलाचे जांबाज वैमानिक विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी कमांडो सुभेदार अहमद खान ठार झाला आहे. एलओसीवर पाकिस्तानी सेनेने केलेल्या गोळीबाराला सडेतोड उत्तर देताना भारतीय सेनेने केलेल्या गोळीबारात अहमद खान मारला गेला असल्याचे समजते. या प्रकारे अभिनंदन यांना दिल्या गेलेल्या वागणुकीचा बदला भारतीय सेनेने घेतला आणि हिशोब चुकता केला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर केल्या गेलेल्या हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथे हवाई हल्ले करून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्यावर पाक हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. तेव्हा पाकिस्तानच्या एफ १६ लढाऊ विमानाचा पाठलाग करून विंग कमांडर अभिनंदन यांनी ते पाडले होते पण त्यावेळी तेही पाकिस्तानी हद्दीत पॅराशुटच्या सहाय्याने उतरले तेव्हा त्यांना कमांडो अहमद खान याने पकडले होते. २७ फेब्रुवारीला अभिनंदन यांना पकडल्याचे फोटो पाकिस्तानने प्रसिद्ध केले तेव्हा अभिनंदन यांच्या मागे दाढीवाला सैनिक दिसत होता तोच हा अहमद खान आहे. तो नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवाला सेक्टर मधून घुसखोरांना भारतीय हद्दीत जाण्यास मदत करण्याचे काम करत होता असे समजते.


अहमद खान पाकिस्तानच्या स्पेशल सर्विस ग्रुप मध्ये कमांडो होता आणि भारतीय हद्दीतून दहशद्वाद्याना भारतात घुसखोरी करण्यास तो मदत करत असे. लाईन ऑफ कंट्रोल वर नाकीयाल सेक्टर मध्ये १७ ऑगस्टला भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अतिरेक्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात सुभेदार अहमद खान मारला गेल्याचे समजते. जम्मू काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानी फौजांनी भारतीय सीमेवर गोळीबार वाढविला आहे. याच भागात अहमद खान तैनात होता.

Leave a Comment