७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींना इस्रोचे विशेष आमंत्रण


येत्या ७ सप्टेंबरला इस्रोने प्रक्षेपित केलेले चांद्रयान २ चंद्राच्या द. ध्रुव भागात उतरणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी इस्रोने पंतप्रधान मोदी यांना खास आमंत्रण दिले आहे. अंतराळ क्षेत्रात भारताच्या इस्रोने ऐतिहासिक यश मिळविताना चांद्रयान २ मंगळवारी सकाळी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचविले आहे. आता या कक्षेतच इस्रो चार वेळा या यानाची दिशा बदलणार आहे. २१, २८, ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला हे काम केले जाणार आहे.

यामुळे चांद्रयान २ चंद्राच्या द. ध्रुवावरून जाताना त्याच्या सर्वात जवळ १०० किमीवर असलेल्या अंतिम कक्षेत जाईल आणि विक्रम लँडर २ सप्टेंबरला यानापासून वेगळे होऊन ७ सप्टेंबरला रात्री १ वा.५५ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोदींना विशेष आमंत्रण दिले गेल्याचे इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी सांगितले.

सिवन म्हणाले, चांद्रयान दोन चे पृथ्वीवरून २२ जुलै रोजी प्रक्षेपण केले गेले त्यात ओर्बिटर, लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान आहेत. यानाची चंद्रकक्षा प्रवेशाची शेवटची ३० मिनिटे अतिशय नाजूक होती. त्यावेळी तणाव, काळजी वाढत गेली पण चांद्रयान दोन चंद्राच्या कक्षेत यशस्वी पोहोचल्यावर इस्रोमध्ये जणू आनंदाची त्सुनामी आली. आम्ही एकमेकांचे अभिनंदन केले. अर्थात आमचे वैज्ञानिक चोवीस तास या मोहिमेवर लक्ष ठेऊन आहेत.

Leave a Comment