पुढील वर्षी क्रिकेटच्या मैदानात उतरणार श्रीसंत


नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल डी के जैन यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप झालेला क्रिकेटपटू एस श्रीसंत याला काहीसा दिलासा दिला असून या प्रकरणात श्रीसंतवर घालण्यात आलेली बंदी पुढल्या वर्षी संपुष्टात येईल, असे डी. के. जैन यांनी म्हटले आहे. श्रीसंत आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील महत्त्वाची वर्षे गेल्या सहा वर्षांपासून बंदीमुळे गमावून बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर ऑगस्ट २०१३ मध्ये बंदी घातली होती.

या प्रकरणात श्रीसंत याच्यासोबतच राजस्थान रॉयल्सचे अजित चंदिला आणि अंकित चव्हाण या क्रिकेटपटूंवरही बंदी घालण्यात आली होती. यावर्षी १५ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अनुशासन समितीचा निर्णय बदलला होता. डी के जैन यांनी ७ ऑगस्ट रोजी आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे की, घालण्यात आलेली बंदी सात वर्षांची असेल आणि पुढल्या वर्षीपासून हे क्रिकेटपटू खेळण्यासाठी मुक्त असतील.

डी के जैन म्हणाले, श्रीसंत याचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त आहे. क्रिकेटपटू म्हणून त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे आता सरली आहेत. त्यामुळे १३ सप्टेंबर २०१३ पासून सात वर्षांसाठी या क्रिकेटपटूंवर बंदी घालणे योग्य राहिल. आजीवन बंदीची गरज नाही.

Leave a Comment