पाकिस्तानात निघून जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना सोनमचे शांतपणाने उत्तर


जम्मू काश्मीरमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल अभिनेत्री सोनम कपूरने भाष्य केल्यानंतर तिच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला. तिला तर ट्रोलर टोळीने चक्क पाकिस्तानात निघून जाण्याचा सल्लाच देऊन टाकला आहे. पण सोनमने खचून न जाता ट्रोलर टोळीला शांतपणाने उत्तर देत त्यांचे थोबाड बंद केले आहे.

आपल्या ट्विटरवर सोनमने प्रतिक्रिया लिहिली आहे की, कृपया शांत व्हा मित्रांनो… एखाद्याला काय म्हणायचे आहे, तुम्ही त्यातून काय अर्थ काढता याचा म्हणणाऱ्यावर परिणाम होत नाही, तर तर्क लावणाऱ्यावर होतो. त्यामुळे कोण आहात तुम्ही हे ओळखा आणि मग तुमचे तुम्हालाच कळेल, अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

सोनमने जम्मू काश्मीर विषयी आपली मते एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, मला वाटते ही गोष्ट खूप किचकट आहे आणि ज्या बातम्या येत आहेत त्यात किती तथ्य आहे हे मला माहिती नाही. सर्व काही शांततेत सुरू असेल आणि काय सुरू आहे हे समजेल अशी मी आशा करते. माझ्याकडे जेव्हा संपूर्ण माहिती येईल तेव्हा मी माझे मत मांडू शकेन. मी अर्धी सिंधी आणि पेशवारी आहे. मला माझ्या संस्कृतीचा एक भाग पाहणे हे फार वाईट वाटत असल्याचेही ती पुढे म्हणाली होती. ट्रोल करणारे तिच्यावर नेमक्या या गोष्टीवरुन तुटून पडले.


सोनम बॉलिवूड चित्रपटांवर पाकिस्तानने बंदी घातल्याच्या मुद्द्यावर म्हणाली, पाकिस्तानात नीरजा प्रदर्शित होऊ शकला नाही, कारण विमान अपहरण करून ते पाकिस्तानातील कराचीला नेण्यात आले होते. तुम्ही एक कलाकार म्हणून सर्वत्र प्रतिनिधीत्व केले जावे आणि तुमचे काम सगळीकडे पाहिले जावे, असे वाटते. चित्रपटात कुठेही पाकिस्तानाला नकारात्मक दाखवले नव्हते, तरीही त्यांनी चित्रपटाला पाकिस्तानात रिलीज होऊ दिले नाही याचे वाईट वाटते.

Leave a Comment