पुण्यात अडकलेल्या ३२ काश्मिरी मुलीना शीख युवकांचा मदतीचा हात


जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हतबल बनलेल्या ३२ काश्मिरी मुलीना त्यांच्या आईवडिलांकडे सुखरूप पोहोचविण्याचे कार्य तीन शीख युवकांनी पार पडले आहे. या सर्व मुली पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र संसदेत कलम ३७० रद्द झाल्यापासून काश्मीर मध्ये १४४ कलम लागू केले गेले होते आणि फोन, मोबाईल, इंटरनेट बंद असल्याने या मुली घरी संपर्क करू शकत नव्हत्या.

याचवेळी दिल्लीतील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण हरमिंदरसिंग अहलुवालिया यांनी घरापासून दूर असलेल्या काश्मिरी लोकांना मदत करण्याचे मिशन हाती घेतले. त्यात बलजितसिंग बब्बू आणि अन्य एक शीख तरुण सहभागी झाले. त्यांनी फेसबुकवर लाइव आवाहन करून मदत सुरु असल्याची माहिती दिली होती. गरज असलेल्या काश्मिरींनी फोनवरून अथवा गुरुद्वारात संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. या काश्मिरी मुलींसोबत असलेल्या सुपरवायझरने अहलुवालिया यांच्याशी संपर्क साधून अडचण सांगितली. या सर्व मुली बरामुला, शोपिया, बडगाम, उरी सेक्टर मधील आहेत.

हरमिंदरसिंग यांनी या मुलींची परिस्थिती जाणून घेतली आणि त्वरित मदतीचे आवाहन करून पैसे गोळा करण्यास सुरवात केली. साडेतीन लाख रुपये जमा होताच त्यांनी या सर्व मुलीना विमानाने श्रीनगर येथे पाठविले आणि तेथून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले. या सर्व मुली घरातून प्रथमच बाहेर पडलेल्या होत्या. त्या सर्व सुखरूप घरी पोहोचल्या तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी या शीख तरुणांना अनेक धन्यवाद दिले. हरमिंदर म्हणाले, काश्मिरी लोक आमच्या समाजाचा भाग आहेत आणि काश्मिरी मुलीना मदत हे आमचे धर्मकृत्य आहे, ते आमचे कर्तव्य आहे.

Leave a Comment