न्यूझीलंड सरकार नागरिकांकडून विकत घेतेय शस्त्रे


न्यूझीलंड सरकारने देशातील नागरिकांकडे असलेल्या शस्त्रांची संख्या कमी करण्यासाठी नवी योजना सुरु केली असून त्यानुसार सरकार नागरिकांकडून शस्त्रे परत खरेदी करत आहे. १५ मार्च रोजी ख्राईस्टचर्च येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५१ लोक ठार झाल्यानंतर न्यूझीलंड सरकारने शस्त्रे संख्या कमी करण्याची योजना २० जून पासून सुरु केली असून गेल्या ५० दिवसात सरकारने १२,१८३ शस्त्रे नागरिकांकडून बाय बॅक केली आहेत. यातील ११ हजार शस्त्रे प्रतिबंधित श्रेणीतील आहेत. या हत्यारांच्या खरेदीपोटी सरकारने ७३ कोटी रुपये संबंधित नागरिकांना दिले आहेत. शस्त्र बायबॅक योजनेसाठी सरकारने २०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ९२० कोटी रुपयाचे बजेट निश्चित केले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार न्यूझीलंडमध्ये वैध आणि प्रतिबंधित अश्या दोन्ही श्रेणीत मिळून १२ लाख शस्त्रे नागरिकांकडे असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या ४७ लाख ९० हजार आहे. त्याचा अर्थ प्रत्येक चार नागरिकांमागे १ शस्त्र आहे. सरकारने या गन खरेदीसाठी ठरविलेल्या योजनेनुसार शस्त्र खराब स्थितीत असेल तर त्याच्या किमतीच्या २५ टक्के रक्कम दिली जाणार आहे व चांगल्या स्थितीत असेल तर किमतीच्या ९५ टक्के रक्कम दिली जाणार आहे.

अमेरिकन अहवालानुसार न्यूझीलंड मध्ये नागरिकांकडे लष्करी सेमी ऑटोमेटिक बंदुका मोठ्या संखेने असून त्यांच्या किमती ७ लाखापासून ७० लाखापर्यंत आहेत. देशात सध्या सेमी ऑटोमेटिक गनवर बंदी असून परदेशी नागरिकांना शस्त्र खरेदीची परवानगी नाही. सरकार शस्त्र परवाना मागणाऱ्या नागरिकांची सोशल मिडिया अकौट तपासणी करण्याचा विचार करत असून शस्त्र परवान्याची मुदत १० वर्षांवरून ५ वर्षांवर आणण्याचा, शस्त्र जाहिरातींवर बंदी आणण्याचा त्यात समावेश आहे.

भारतात शस्त्र बाळगण्याविषयीचे कायदे कडक असूनही देशात नोंदणी केलेली ९७ लाख तर नोंदणी न झालेली ६.१ कोटी फायर आर्म्स असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment