नवरोज- पारसी नववर्ष


जगभरात बहुतेक देशात ग्रेगोरीयन कॅलेंडर मानले जाते. यात नवीन वर्षाची सुरवात १ जानेवारीला होते. पण असेही अनेक समुदाय आहेत ज्यांची स्वतःची स्वतंत्र कालगणना आहे. हिंदू कॅलेंडरप्रमाणे गुढी पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरवात होते. पंजाबी लोक १३ एप्रिल ला बैसाखी साजरी करतात तो त्यांच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. आंध्रप्रदेशात उगाडी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर पारसी लोक नवीन वर्ष नवरोज या नावाने साजरे करतात. यंदा १७ ऑगस्टला नवरोज मुबारक असा ट्रेंड सोशल मिडियावर सुरु झाला तो अजूनही सुरु आहे.

नवरोजलाच पतेती किंवा जमशेद नवरोज असेही म्हटले जाते. ही परंपरा ३ हजार वर्षे जुनी आहे. त्याची कहाणी अशी सांगतात की पारसी नववर्ष फारसचा राजा जमशेद याची आठवण म्हणून साजरे केले जाते. ३ हजार वर्षापूर्वी या समुदायाचा योद्धा जमशेद याने प्रथम पारसी कॅलेंडर सुरु केले. यात वर्षात ३६० दिवस असतात आणि शेवटचे पाच दिवस गाथा म्हणून पाळले जातात. वर्ष संपण्यापूर्वीचे हे दिवस पूर्वजांची आठवण म्हणून साजरे केले जातात. त्यात पहाटे साडेतीन वाजता खास पूजा केली जाते.


पारसी समुदाय अग्नीपूजक आहे. गाथा साजरे केले जात असताना घराची स्वच्छता करून रांगोळ्या रेखल्या जातात. विविध प्रकारची पक्वाने बनविली जातात. येणाऱ्या पाहुण्यांना फालुदा देण्याची पद्धत आहे. नवरोजच्या दिवशी चंदनाचा तुकडा घरात ठेवला जातो. यामुळे घरातील वातावरण शुध्द राहते असे मानले जाते. पारसी समुदाय हिंदुस्तानात अल्पसंख्याक आहे मात्र बहुतेक सारे बडे उद्योजक पारसी आहेत. त्यात टाटा, गोदरेज यांचा समावेश आहे.

Leave a Comment