स्वरसम्राज्ञीच्या भेटीला राष्ट्रपती कोविंद


महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्नी आणि मुलगी स्वाती यांच्यासह मुंबईत स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. रविवारी राष्र्वपती लतादीदींच्या घरी गेले. या भेटीने भारावलेल्या लता दिदींनी ट्विटरवरून या भेटीची माहिती देताना काही फोटो शेअर केले आहेत.

राष्ट्रपती यावेळी म्हणाले, केवळ भारतातील नाही तर परदेशातील लोकांनाही तुमच्या भेटीची इच्छा असते. आज माझीही ही इच्छा पूर्ण झाली. तुम्ही तुमच्या आवाजाने आणि गाण्यांनी आमच्या जीवनात आनंद फुलविला आहे. राष्ट्रपतींनी मंगेशकर कुटुंबीयाबरोबर मनसोक्त गप्पाही मारल्या. राष्र्वपतींनी या भेटीची माहिती फोटोसह ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी या भेटीत लतादीदींना आरोग्यप्राप्ती साठी शुभेच्छा दिल्या.

लतादीदी म्हणाल्या, देशाची सन्माननीय व्यक्ती माझी चौकशी करण्यासाठी घरी येऊन भेटते याचे आश्चर्य वाटलेच पण आनंदही झाला. हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे. राष्ट्रपती घरी आले यामुळे मला खूपच सन्मानित झाल्यासारखे वाटते आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये लतादीदीनी राष्ट्रपतींना माझे ‘ ए मेरे वतन के लोगों ‘ हे गाणे सर्वाधिक प्रिय असल्याचे आजच समजले त्यामुळे हे गाणे मी त्यांना अर्पण करते आहे असेही म्हटले आहे.

Leave a Comment