या तरुणाने अनवाणी धावत पूर्ण केली 100 मीटरची शर्यत


भोपाळ : वेगाचा बादशहा म्हणून उसेन बोल्ट हा ओळखला जातो. बोल्टच्या नावावर 100 मीटरमध्ये सर्वात कमी वेळेची नोंद करण्याचा विक्रम आहे. पण सध्याच्या घडीला सोशल मीडियात भारताचा उसेन बोल्ट म्हणून मध्य प्रदेशातील एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियात त्याने पायात बूट, चप्पल काहीही न घालता 100 मीटर शर्यत 11 सेकंदात पूर्ण करणारा हा व्हिडिओ शेअर होत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तरुणाला अॅथलेटिक्स अॅकॅडमीत प्रवेश देण्याचे आश्वासन क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी दिले आहे. रामेश्वर गुर्जर असे मध्य प्रदेशातील त्या तरुणाचे नाव आहे. शिवपुरीतील एका शेतकरी कुटुंबातील 19 वर्षांचा असलेला रामेश्वर आहे.


रामेश्वरचा व्हिडिओ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेअर केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, प्रतिभावान खेळाडूंची भारताकडे कमी नाही. योग्य संधी आणि व्यासपीठ त्यांना मिळाले तर इतिहास घडवू शकतात. किरण रिजिजू यांना विनंती आहे की या तरुण खेळाडूच्या कौशल्यात भर पडावी यासाठी मदत करावी. याशिवाय राज्याच्या क्रीडा मंत्री जीतू पटवारी यांनी रामेश्वर गुर्जरचा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, योग्य प्रशिक्षण आणि सोयीसुविधा मिळाल्या तर तो 100 मीटरची शर्यत 9 सेकंदात पूर्ण करू शकतो.

अमिया मलिकच्या नावावर सर्वात वेगवान 100 मीटर शर्यत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय विक्रम आहे. 10.26 सेकंदात शर्यत त्याने पूर्ण केली होती. जमैकन धावपटू उसेन बोल्टच्या नावावर 100 मीटरची शर्यत सर्वात कमी वेळेत पूर्ण करण्याचा विश्वविक्रम आहे. 9.58 सेकंदात त्याने शर्यत पूर्ण केली होती.

Leave a Comment