मिका सिंह सांगली-कोल्हापूरमध्ये बांधून देणार 50 घरे


मुंबई : सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 50 घरे बांधून देण्याची घोषणा वादामुळे नेहमीच चर्चेत असलेला गायक मिका सिंहने केली आहे. मिकाने नुकतेच पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स केला म्हणून त्याच्यावर सिनेवकर्स इंडियन असोसिएशनने बंदी घातली आहे. आता जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत याप्रकरणामुळे वादात असलेल्या मिकाने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

मिका म्हणाला, महाराष्ट्रातील पुरामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मोठे नुकसान झाले आहे. लोक अडचणीत आहेत. महाराष्ट्र सरकार आपले काम करत आहे, जवान देखील चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मराठी सिनेसृष्टीशी संबंधित एनजीओ चांगले काम करत आहे. पूरग्रस्त मराठी बांधवांना माझे आश्वासन आहे की माझ्यातर्फे पूरग्रस्त भागात मी 50 घरे बांधून देईन.

पूरग्रस्त भागात घरे बांधण्याचे आश्वासन देतानाच, मिकाने देशभरातील जनतेला मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या मदतीसाठी संपूर्ण देश एकत्र यावा. विशेषत: माझ्या बॉलिवूडमधील मित्रांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला, तर मी 50 घरे बांधणार आहे, त्याची संख्या आपल्यामुळे हजारांवर पोहचू शकते. संपूर्ण देशाने मदत केली तर हजारो घरे बांधून होतील…जय महाराष्ट्र, जय हिंद, असे मिका म्हणाला.

Leave a Comment