बजरंग पुनिया, विनेश फोगटला खेलरत्न जाहीर


कुस्ती महासंघाने क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांची शिफारस केली होती आणि निवड समितीने या दोघांचीही या सन्मानासाठी एकमताने निवड केल्याचे समजते. बजरंग सध्या जॉर्जिया मध्ये प्रशिक्षण घेत असून या पुरस्कारावर त्याचा हक्क होताच अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

गेल्यावर्षीही बजरंगची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती पण त्याला डावलले गेले होते. त्याने कॉमनवेल्थ गेम्स २०१८ मध्ये आणि आशियाइ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. पुनिया सातत्याने उत्तम कामगिरी बजावीत आहे. २०१५ मध्ये त्याला अर्जुन अॅवॉर्ड तर २०१८ मध्ये पद्मश्री दिली गेली आहे.

पुनिया खेलरत्न पुरस्काराबद्दल म्हणाला, कसून सराव करणे हे माझे काम आहे. कामगिरी उत्तम असेल तर सन्मान आपोआप मिळतात. मी नेहमीच म्हणत आलो आहे, हक्कदार खेळाडूलाच असे पुरस्कार दिले जावेत. या पुरस्कारासाठी माझ्याकडे पात्रता आहे त्यामुळे तो मिळाल्याचा आनंद आहे. यापूर्वी हा पुरस्कार कुस्तीपटू सुशीलकुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांना मिळाला आहे.

दरवर्षी महान हॉकीपटू ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी म्हणजे २९ सप्टेंबरला खेळ पुरस्कार दिले जातात. राजीव गांधी खेलरत्न हा यातील सर्वात मोठा पुरस्कार असून त्यात पदक, प्रशस्तीपत्र. ७.५ लाख रुपये बक्षीस दिले जाते.

Leave a Comment