ट्रम्पना खरेदी करायचेय जगातील सर्वात मोठे बेट - Majha Paper

ट्रम्पना खरेदी करायचेय जगातील सर्वात मोठे बेट


वॉलस्ट्रीट जर्नलने दिलेल्या बातमीनुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील सर्वात मोठे बेट आणि जगातील १२ वा मोठा देश खरेदी करायची इच्छा आहे. या खरेदीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या बेटाचे आणि देशाचे नाव आहे ग्रीनलंड. अर्थात डोनाल्ड यांच्या इच्छेला डेन्मार्क आणि ग्रीनलंड वासियांनी कडा विरोध केला असून ओपन फॉर बिझिनेस, नॉट फॉर सेल अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रम्प लवकरच ग्रीनलंडचा दौरा करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या अधिकारयांना अमेरिका ग्रीनलंड खरेदी करू शकते काय असे विचारल्याचे समजते. डेन्मार्क दौऱ्यात ट्रम्प या खरेदीबाबत चर्चा करणार आहेत असेही सांगितले जात आहे. ग्रीनलंड या नावावरून येथे प्रचंड हिरवाई असावी असा समज असेल तर तो चुकीचा आहे. येथे वर्षातील काही महिने पूर्ण बर्फ असते आणि काही भागात गवताचे पातेही उगवत नाही. हा एक देश आहे पण त्याच्या वरच्या भागावर डेन्मार्कचे नियंत्रण आहे.

या देशाचे विशेष म्हणजे, तो आहे उत्तर अमेरिकेत पण त्याला युरोपचा भाग मानले जाते. क्षेत्रफळाचा विचार केला तर ते जगातील मोठे बेट आहे पण येथे एकही रस्ता अथवा रेल्वे नाही. येथे हेलिकॉप्टर आणि विमानानेच प्रवास होतो. या देशाची लोकसंख्या ५७ हजार असून येथे डॅनिश भाषा बोलली जाते आणि येथील चलन आहे डॅनिश क्रोन. यापूर्वीही अनेक अमेरिकन अध्यक्षांनी हे बेट विकत घेण्याचा विचार केला होता. १९४६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी १०० दशलक्ष डॉलर्सचा खरेदी प्रस्ताव डेन्मार्कला दिला होता पण त्यांनी तो नाकारला होता.

Leave a Comment