देशातील पहिला टीक-टॉक चित्रपट महोत्सव पुण्यात होणार


पुणे शहर हे बुद्धीवंतांचे आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते आणि याच शहराने अनेकदा आपल्या विविध कृतींनी हे दाखवूनही दिले आहे. पुणे आपल्या विविध कलागुणांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुणे आता वेगळ्या पद्धतीने देशभरात वादग्रस्त ठरलेल्या टीक-टॉकला समजून देऊ पाहात आहे. पहिला ‘टीक-टॉक चित्रपट महोत्सव’ पुणे शहरात पूर्णपणे नियोजनबद्धरित्या पार पडणार आहे. त्याचबरोबर या महोत्सवमध्ये रुपये 3333 ते 33 हजार रुपयांपर्यंतची पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. देशभरातील अशा पद्धतीचा हा पहिलाच ‘टीक-टॉक चित्रपट महोत्सव’ असल्याचा दावाही आयोजकांनी केला आहे. दरम्यान, आपल्याला माहिती असेलच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून झालेली टीका त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घातली होती आणि नंतर ती हटविण्यात आली.

21 डिसेंबर रोजी पुणे येथील घोले पाटील रोड येथे हा फेस्टिव्हल पार पडणार आहे. ‘टीक-टॉक चित्रपट महोत्सव’ घोले रोडवर असलेल्या नेहरु हॉलमध्ये साजरा होईल. या फेस्टवलमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी 20 ऑगस्ट पर्यंत आपले व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. जर या फेस्टिव्हलमध्ये आपली टीक-टॉक शॉर्ट फिल्म आपल्याला सहभागी करायची असेल. तर, त्यासाठी आयोजकांनी ठरवून दिलेले शुल्क भरावे लागेल. टीक-टॉक चित्रपट महोत्सव आयोजक प्रकाश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, हा फेस्टिव्हल टीक-टॉक युजर्ससाठी मोठी पर्वणी असणार आहे. जगभरातील लोकांना युजर्स दाखवू शकतात की आपण काय बनवले आहे. पुढे बोलताना ते सांगतात की, टीक-टॉक युजर हा स्वत: कॅमेरामनही आहे, दिग्दर्शकही आहे आणि निर्माताही आहे.

दरम्यान, प्रकाश यादव टीक-टॉक चित्रपट महोत्सव आयोजित करण्याची कल्पना आपल्या डोक्यात कशी आली? असे विचारता सांगतात की, महाविद्यालयीन तरुणांना मी नेहमीच पाहात असतो. खूप सारे व्हिडिओ ते बनवत असतात. त्यातील अनेक व्हिडिओ हे नवनव्या संकल्पनांनी भारलेले असतात. त्यामुळे मला वाटले या तरुणांना संधी मिळायला हवी. त्यासाठी एक व्यासपीठ असायला हवे. चित्रपट महोत्सवासाठी प्रवेश घेण्यासाठी प्रवेशिका मागविल्या आहेत. यात पुरस्कारासाठी अनेक श्रेणी आहेत. ज्यात बेस्ट इन कॉमेडी, बेस्ट इन प्रँक आणि सामाजिक जनजागृती अशा श्रेणींचा समावेश आहे.

Leave a Comment