पुन्हा दोन दिवसांसाठी बंद होणार मुंबई-पुणे रेल्वेसेवा


मुंबईः मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई पुणे रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. गेल्या १३ दिवसांपासून मुंबई पुणे रेल्वेमार्ग कर्जत ते लोणावळादरम्यान दरड कोसळण्याच्या घटनांमुळे बंद ठेवण्यात आला होता. हा रेल्वेमार्ग इतिहासात पहिल्यांदाच एवढे दिवस बंद होता. पण असे असले तरी आज या रेल्वेमार्गावर काही निवडक गाड्या चालवण्यात येणार आहेत. या मार्गावरून आज १२ मेल आणि एक्सप्रेस चालवण्यात येतील.

आज रेल्वेमार्ग सुरू झाला असला तरी पण त्यानंतर दोन दिवस मुंबई पुणे रेल्वेमार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई पुणे मेल आणि एक्सप्रेस १७ आणि १८ ऑगस्टला रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मुंबई ते पुणे केवळ एकच दिवस प्रवास करता येणार आहे. मुंबई ते पुणेपर्यंत होणारी वाहतूक दक्षिणेतील वडसिंघे ते भालवण पट्ट्यात दुहेरी मार्गाचे सुरू असलेले काम यामुळे पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखीन दोन ते तीन दिवस प्रवाशांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे. मुंबई ते पुणे या रेल्वेमार्गावर आज सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्विन एक्सप्रेस, पुणे ते मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, पुणे ते मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस धावेल. त्यानंतर दोन दिवस पुन्हा या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


आणखी काही अभियांत्रिकी कामे कर्जत ते लोणावळादरम्यान करण्यात येणार असून सोलापूरच्या पुढे असणाऱ्या वडसिंघे ते भालवणदरम्यान दुरूस्ती सुरू असल्याने गाड्या रद्द राहतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. तसेच मुंबई ते पुणे मेल- एक्सप्रेस गाड्यांसाठी वेगमर्यादा ताशी ३० पर्यंत कमी केला आहे.

दोन दिवस रद्द असणाऱ्या गाड्यांची यादी
मुंबई- चेन्नई
मुंबई-पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस
मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस
मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
पुणे- मुंबई-पुणे डेक्कन क्वीन
मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस
मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस
बिदर-मुंबई-बिदर
सोलापूर-मुंबई-सोलापूर
नांदेड-पनवेल
हुबळी-एलटीटी

१७ ऑगस्टला अशा २० मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तर १८ गाड्या १८ ऑगस्टला रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रेन क्रमांक ११०२७ मुंबई ते चेन्नई, ११०२४ कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १२११५ मुंबई ते सोलापूर यासह अनेक गाड्यांचा यात समावेश आहे. तसंच १९ ऑगस्टला गाडी क्रमांक २२१०७ मुंबई ते लातूर ही एक्सप्रेसही रद्द केली आहे. १८ ते २७ ऑगस्टपर्यंत पनवेल ते पुणे ते पनवेल गाडीही रद्द करण्यात आली आहे.

Leave a Comment