मुकेश अंबानीच्या संपत्तीत दोन दिवसांत 29 हजार कोटींची वाढ


नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांत देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती असलेले रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली असून शेअर बाजारात यादरम्यान मोठी घसरण सुरू असताना हा फायदा त्यांना झाला आहे. केवळ दोन दिवसांत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 29 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

या वेगवान घटना सोमवारी (12 ऑगस्ट) रिलायन्स इंडस्ट्रीच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर घडल्या आहेत. मोठमोठ्या घोषणा कंपनीच्या 42व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत करण्यात आल्या होत्या. सौदीतील तेल कंपनी अरामकोला 20 टक्के शेअर विक्री करण्याचा सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय देखील यामध्ये घेण्यात आला होता.

त्याचबरोबर 18 महिने कंपनीने स्वतःला पूर्णतः कर्जमुक्त करण्याचा आणि पुढील महिन्यात जिओ फायबर लाँच करण्याचेही जाहीर केले. दलाल स्ट्रीटने रिलायन्स इंडस्ट्रीजकडून करण्यात आलेल्या घोषणांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले. गेल्या दोन दिवसांतच कंपनीच्या शेअरर्समध्ये या निर्णयांमुळे वाढलेल्या उत्साहामुळे 11 टक्क्यांचा वाढीव फायदा झाला आहे. यानुसार आतापर्यंत मुकेश अंबानी यांना संपत्तीत 28 हजार 684 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

Leave a Comment