आम्हाला एखाद्या जनावरासारखे ठेवले आहे डांबून – मुफ्ती


नवी दिल्ली – अद्यापही जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथील करण्यात आलेले नसून अजूनही अनेक पक्षांचे नेते अटकेत आहेत. दरम्यान जम्मू-काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ मेसेज मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा जावेदने रिलीज केला असून, आम्हाला एखाद्या जनावरासारखे डांबून ठेवण्यात आले असून आम्हाला घरात बंदिस्त ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रसारमाध्यमांशी जर पुन्हा आपण संवाद साधला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचेही म्हटले आहे. आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागितल्याची माहिती इल्तिजाने दिली आहे.

अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात इल्तिजाने म्हटले आहे की, देशभरात जेव्हा सगळीकडे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे, तर दूसरीकडे काश्मिरींना जनावरांप्रमाणे कैद करुन ठेवण्यात आले आहे. मुलभूत मानवाधिकारांपासून त्यांना वंचित ठेवले जात आहे. रिलीज केलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये इल्तिजाने सांगितले आहे की, मला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. कर्फ्यू लागू करण्यात आल्यानंतर काश्मिरींना काय सहन करावे लागत आहे याबाबत मी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्याने ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मी पुन्हा प्रसारमाध्यमांशी जर संवाद साधला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मला वागणूक दिली जात असून, माझ्यावर वारंवार नजर ठेवली जात आहे. ज्या काश्मिरींना विरोध केला आहे, त्यांच्यासोबत मलादेखील जीवाची भीती वाटू लागली आहे.

Leave a Comment