233 प्रवाशांना घेऊन चक्क शेतात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग


मॉस्को : रशियातील 233 प्रवाशांना चमत्कार काय असतो याचा अनुभव आला. इमर्जन्सी लँडिंग जवळपास अडीचशे प्रवासी घेऊन जात असलेल्या यूराल एअरलाईन्स एअरबस 321 या विमानाला करावे लागले. हे विमान इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मक्याच्या शेतातच उतरवण्यात आले. या इमर्जन्सी लँडिंगमुळे विमानाचेही नुकसान झाले, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


टेकऑफनंतर काही वेळातच एक पक्षी येऊन विमानाला आदळला आणि त्याचा परिणाम इंजिनवरही झाला. गुरुवारी ही घटना रशियाची राजधानी मॉस्कोजवळच घडली. रशियन आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 23 प्रवाशांना दुखापत झाली आहे. पण यापैकी कुणालाही गंभीर दुखापत झालेली नसल्यामुळे सर्वजण सुखरुप आहेत.

सात क्रू मेंबर्स आणि 226 प्रवासी या विमानात होते. हे विमान मॉस्कोमधील झुकोवस्की विमानतळावरुन रशियाला लागूनच असलेल्या क्रिमियामध्ये जाणार होते. टेकऑफनंतर लगेच बिघाड जाणवला आणि धावपट्टीपासून एक किमीच्या अंतरातच विमान मक्याच्या शेतात उतरवण्यात आल्याची माहिती ट्रान्सपोर्ट कंपनी रोसावियात्सियाने दिली.

या घटनेनंतर प्रवाशांची तातडीने सुटका करण्यात आली, तर रुग्णालयात जखमींना हलवण्यात आले. जखमी झालेल्या 23 जणांपैकी 9 लहान मुले आहेत. सर्वांनी या चमत्कारिक घटनेनंतर वैमानिकाचे आभार मानले. येकातेरिनबर्ग येथील रहिवासी असलेल्या वैमानिकाचे नाव दामिर युसुपोव असे आहे.

Leave a Comment