अरुण जेटलींना गुजरातच्या मंत्र्याने जीवंतपणीच वाहिली श्रद्धांजली


अहमदाबाद – सध्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असली तरी स्थिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अनेक दिग्गज नेते ९ ऑगस्ट रोजी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये गेले होते. दरम्यान, पक्षाला लाज आणणारी कृती गुजरातचे पर्यटन मंत्री आणि भाजप नेते वासन अहिर यांनी केली. त्यांनी १० ऑगस्ट रोजी कच्छमध्ये आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात जेटलींना चक्क श्रद्धांजली वाहून टाकली.

या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या कार्यक्रमात जेटलींना केवळ श्रद्धांजलीच वाहिली नाही तर तिथे उपस्थित शेतकऱ्यांना आणि मान्यवरांना गुजरातच्या पर्यटनमंत्र्यांनी दोन मिनिटांचे मौनही बाळगण्यास सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन कच्छच्या मांडवी तालुक्यातील बिदाद गावात करण्यात आले होते.

कच्छच्या माहिती विभागाने आमदारांची ही चूक कोणतीही शहानिशा न करता तशीच पुढे रेटली. या कार्यक्रमाची एक प्रेसनोट माहिती विभागाने तयार केली. यामध्ये उपस्थित मान्यवरांनी आणि शेतकऱ्यांनी जेटलींना श्रद्धांजली वाहिल्याचे म्हटले होते.

Leave a Comment