आनंद महिंद्रांनी नेटकऱ्यांना दाखवली एका भाजीवाल्याची क्रिएटिव्हिटी


ट्विटरच्या माध्यमातून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे कायम सक्रिय असल्याचे आपण कायमच पाहिले आहे. ते कायम ट्विटरवरून दैनंदिन घटनांबद्दल आणि वेगवेगळ्या घडामोडींबद्दल व्यक्त होताना दिसतात. गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त महिंद्रा यांनी केलेले ट्विट इंटरनेटवर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे. भाज्यांपासून साकारण्यात आलेला तिरंगा या ट्विटमध्ये दिसत आहे.

सतत वेगवेगळ्या विषयांवर आनंद महिंद्रा हे ट्विटरवर आपले मत व्यक्त करत असतात. मग ते अगदी व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो असो किंवा फिरण्यांच्या ठिकाणांची माहिती विचारणे असो आनंद महिंद्रा ट्विटरवरुन आपल्या फॉलोअर्सशी सतत संपर्कात असतात. काल आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी रात्री पावणे अकराच्या सुमारास एक फोटो आपल्या अकाऊण्टवरुन ट्विट केला आणि तो फोटो काही क्षणातच व्हायरल झाला.


एका भाजीविक्रेत्याच्या पाटीच्या कडेवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने तिरंगा साकारलेला आनंद महिंद्रांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये दिसत असून या फोटोत पाटीच्या एका काडीमध्ये वर गाजर, मध्यभागी मुळा आणि तळाला भेंडी खोचून तिरंगा तयार करण्यात आल्याचे दिसते. आनंद महिंद्रा हा फोटो ट्विट करताना म्हणतात, स्वातंत्र्य दिनाचा दिवस संपत आला असला तरी हा फोटो आजच्या दिवसात माझ्या मनात घर करुन राहिलेला आहे. देशाबद्दल असणारे प्रेम आणि विश्वास एका भाजीविक्रेत्याने अशा साध्या पद्धतीने व्यक्त केले आहे. तसे पाहिले तर बनवण्यासाठी सर्वात स्वस्त पण भावना स्पष्टपणे व्यक्त करणारा हा फोटो आहे.

Leave a Comment