मद्यपान करुन गाडी चालवल्या प्रकरणी भाजप महिला खासदाराच्या मुलाला अटक


कोलकाता : कोलकाता पोलिसांनी भाजपच्या राज्यसभेच्या खासदार आणि अभिनेत्री रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ही कारवाई मद्यपान करुन कार चालवताना झालेल्या दुर्घटनेप्रकरणी करण्यात आली. कोलकाता पोलिसांनी विविध कलमांतर्गत 21 वर्षीय आकाशवर गुन्हा दाखल केला आहे. खासदार रुपा गांगुली यांनी अपघात आणि कारवाईनंतर पंतप्रधान मोदींना टॅग करुन ट्विट केले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोलकात्यातील एका क्लबच्या भिंतीवर जाऊन गुरुवारी रात्री नशेत असलेल्या आकाश मुखर्जीची कार आदळली. कारचे या अपघातात नुकसान झाले आहे. आकाश नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कार सुसाट होती, ती भिंतीवर आदळल्याने सुदैवाने या दुर्घटनेत अनेकांचा जीव वाचल्याचाही दावा स्थानिकांनी केला.

आकाशला या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे. जादवपूर पोलिसांनी अपघातानंतर घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतले. आकाशची वैद्यकीय चाचणी करुन तो नशेत होता की नाही हे पाहिले जाईल असे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, खासदार रुपा गांगुली यांनी या अपघातानंतर मोदींना टॅग करुन ट्विट केले. माझ्या घराजवळच माझ्या मुलाचा अपघात झाला आहे. पोलिसांना फोन करुन मी कायद्यानुसार काळजी घेण्यास सांगितले. कोणताही पक्षपातीपणा किंवा कोणतेही राजकारण करु नये, असे रुपा गांगुली म्हणाल्या. त्याचबरोबर माझ्या मुलावर माझे प्रेम आहे. त्याची मी काळजी घेईन, पण कायद्यानुसार सर्व प्रक्रिया व्हावी. ना मी चुकीचे करते, ना मी चुकीचे सहन करते, मी बिकाऊ नसल्याचे म्हणत रुपा गांगुली यांनी मोदींना टॅग केले आहे.

Leave a Comment