भाऊबहिणीचे नाते दृढ करणारी राखी पौर्णिमा

rakhi
श्रावणात येणारी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते तशीच ती राखीपौर्णिमा म्हणून भारतभर साजरी केली जाते. भाऊ बहिणीचे नाते तसे अनोखेच. राखी पौर्णिमा प्रेम आणि कर्तव्य यांची सूचक आहे. विशेष म्हणजे एक साधासा धागा बंधुरायाच्या हातात बांधून बहिण जन्मभराचे रक्षण करण्यासाठी भाऊरायाला जणू बंधनात बांधते आणि यासाठी भाऊ बहिणीचे रक्ताचे नाते हवे असेही नाही. कोणत्याही जातीधर्माची या बंधनासाठी अट नसते. असतो तो केवळ बंधुभाव.

भारतात बहुतेक सर्वत्र राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. हिंदू, जैन आणि कांही शिख धर्मियही हा सण साजरा करतात. भारताप्रमाणेच नेपाळ, मॉरिशस आणि पाकमधील हिंदू शिख समाज तसेच जगाच्या पाठीवर जेथे हे समाज आहेत त्या सर्व ठिकाणी रक्षाबंधन साजरे केले जाते.

भारतीय संस्कृतीत सणसमारंभांची मुळातच रेलचेल आहे. त्यातून श्रावण हा सण उत्सवांचा महिना. प्रत्येक सणाचे वेगळे वैशिष्ठ आहे आणि त्यातून कुटुंब, गुरू, आईवडील, भाऊबहिणी यांच्या नात्यांचा अतिशय हृद्य असा गोफ उलगडला गेला आहे. रक्षाबंधनाचे संदर्भ विष्णुपुराण, भविष्यपुराणांपासून सापडतात. महाभारतातही द्रौपदी कृष्णाला राखी बांधत असल्याचे उल्लेख आहेत. त्यापूर्वी भविष्यपुराणात लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून विष्णुची बळीच्या महालातून सुटका केल्याची कथाही आहे. तसेच रजपूत राणीने मुघल सम्राटाला राखी बांधून आपले राज्य सुरक्षित ठेवल्याची कथाही आहेच.

बळी राजाकडून विष्णुने वामनावतार घेऊन तीन पावले भूमी मागितली होती. पहिल्या पावलात आकाश, दुसर्‍या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल बलीच्या डोक्यावर ठेवून विष्णुनी त्याला पाताळात ढकलले होते. मात्र विष्णुंचा हा कावा ओळखूनही बळी वामनरूपी विष्णुची मागणी पूर्ण करण्यासाठी पाताळात गेला होता. पाताळातील आपल्या महालात विष्णुनी राहावे म्हणून बळीने वर मागितला आणि विष्णुंना तो द्यावा लागला मात्र लक्ष्मीला या महालात राहण्याची इच्छा नव्हती. मग तिने बळीला भाऊ मानून राखी बांधली आणि त्या बदल्यात विष्णूंसह वैकुठांत परत जाण्याची इच्छा व्यक्त केली असे ही कथा सांगते.

राखीबंधनाचा सण विविध प्रकारे साजरा केला जात असला तरी सर्वसाधारणपणे बहिणीच्या अथवा भावाच्या घरी सर्व नातेवाईक एकत्र जमतात. राखी देवासमोर ठेवून तिची पूजा केली जाते. भाऊरायाला पाटावर बसवून कुंकुमतिलक लावला जातो. नंतर त्याला ओवाळले जाते आणि उजव्या हातात राखी बांधली जाते. या निमित्त भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो अशी आजची प्रथा आहे. बहिणी भावाच्या सुखसमृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि भाऊ बहिणींना कोणत्याही परिस्थितीत रक्षण करेन असे आश्वस्त करतो.गोडधोड पदार्थांनी मग तोंड गोड केले जाते.

आजकाल अनेक प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. साध्या रेशमीगोंड्यापासून ते सोने, चांदी, हिरे जडविलेल्या राख्याही बाजारात मिळतात. मात्र प्राचीन काळात थोडे डोकावले तर अशी माहिती मिळते की रोग निवारक औषधे रेशमी अथवा तलम सुती कपड्यात बांधून आरोग्याचे संरक्षण व्हावे म्हणून राखी बांधली जात असे. श्रावण महिना हा पावसाचा महिना आहे. या काळात अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. अनेक प्रकारचे किडे किटक वातावरणात असतात. त्यांच्यापासून सुरक्षित राहाता यावे म्हणून हे बंधन समारंभपूर्वक बांधले जात असे. यात लोकरी, सुती अथवा रेशमी कपड्यात मोहरी, केशर, चंदन, अक्षता म्हणजे तांदूळ आणि दुर्वा बांधल्या जात असत. शेणाने सारविलेल्या जमिनीवर पाण्याने भरलेला कलश मांडून त्यावर या राखीची पूजा केली जात असे आणि वैदिक मंत्रांच्या उद्घोषात ती उजव्या हाताच्या मनगटात बांधली जात असे. आजच्या काळाप्रमाणे आता या सणाचे स्वरूप बदलत गेले आहे.

Leave a Comment