या आयएएस अधिकाऱ्याची न्यारीच कथा


स्वच्छता ही सर्वाना हवीहवीशी वाटते फक्त ती दुसरा कुणी करत असेल तर. घर, ऑफिस सगळीकडे लोकांची हीच मनोवृत्ती दिसून येते. मात्र याला छेद दिला आहे डॉ. अजयशंकर पांडे या आयएएस अधिकाऱ्याने. अजयशंकर पांडे दररोज कार्यालयात दहा मिनिटे अगोदर येऊन स्वतःची केबिन झाडूनपुसून स्वच्छ करतात. द बेटर इंडियाशी बोलताना त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.

याची सुरवात कधी झाली याविषयी बोलताना ते म्हणाले, १९९३ मध्ये ते आग्रा येथे सबडिव्हीजनल मॅजिस्ट्रेट होते. तेव्हा तेथील सफाई कामगार संपावर गेले. अजय यांनी या कामगाराच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न केले मात्र तरीही सफाई कामगार कामावर येण्यास तयार होईनात तेव्हा त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन ऑफिस स्वच्छ केले. सुरवातीला लोकांनी टिंगल केली पण त्यानंतर अजय यांनी दररोज हाच उपक्रम सुरु ठेवला.

अजयशंकर सांगतात, मी कार्यालयातील सर्वाना पटवून देण्याचा प्रयत्न करतो स्वच्छता हि कुणा एका गटाची जबाबदारी नाही. काही ठराविक लोकांनीच स्वच्छता करावी हे चुकीचे आहे. बाहेर सफाई कामगार व घरात महिला सफाई करतात हे बरोबर नाही. अजयशंकर यांची त्यानंतर अनेक जागी बदली झाली पण प्रत्येक कार्यालयात त्यांनी हाच उपक्रम राबविला आहे. त्यांच्या ऑफिस बाहेर झाडू, पोछा आणि एक बोर्ड असतो. त्यावर लिहिलेले आहे, हे ऑफिस मी स्वतः झाडले आहे, ते घाण करून माझे काम वाढवू नका. अजयशंकर यांची बदलीनिमित्ताने ऑफिस बदलतात पण प्रत्येक ऑफिस बाहेरचा हा बोर्ड कायम असतो.