टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून कर्मचाऱ्यांना पाजले मासे-कोंबड्यांचे रक्त


बीजिंग : सध्याच्या घडीला खासगी कंपन्यांमध्ये टार्गेट हे काही आता नवे राहिलेले नाही. अगदी व्यवस्थित आणि ठरवून दिलेल्या वेळेत हे टार्गेट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याला भरघोस पगार तसेच बढतीदेखील मिळवून देते. पण जो कर्मचारी टार्गेट पूर्ण करू शकत नाही अशा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढतोच त्याचबरोबर त्याच्या पगारवाढीलाही चाप बसतो. एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना या टार्गेटच्याच भानगडीमुळे अतिशय क्रूर शिक्षा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. कंपनीच्या मालकाने 12 हून अधिक कर्मचाऱ्यांना टार्गेट अपूर्ण राहिल्याने मासे आणि कोंबड्यांचे रक्त पिण्याची शिक्षा दिली. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात ही शिक्षा ऐकून अक्षरशः पाणी आले. जगभरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडीओची तुफान चर्चा सुरू आहे. चीनमध्ये हा प्रकार घडला आहे.

एक व्यक्ती व्हायरल व्हिडीओमध्ये ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना बादलीतून मासे काढून खायला सांगत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात चिनी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 4 ऑगस्ट रोजी घडली आहे. संबंधित कंपनीने टार्गेट पूर्ण न करणाऱ्या 20 कर्मचाऱ्यांना शिक्षा सुनावत मासे आणि कोंबड्यांचे रक्त पिण्याची सक्तीदेखील केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या शिक्षेनंतर कर्मचारी भविष्यात हीच चूक पुन्हा करणार नाहीत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या शिक्षेमुळे त्यांना उत्तम काम करण्याची प्रेरणादेखील मिळेल. दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की खोटा? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे ही घटना सत्यात घडल्याचे कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याने मान्य केले आहे. त्याचबरोबर यामध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःहून सहभाग घेतल्याचेही त्याने सांगितले.

Leave a Comment