रशिया बनला पबजीचा पहिला ‘जगतजेत्ता’


सध्या सर्वच वयोगटामध्ये ‘पबजी’ या ऑनलाइन मल्टीप्लेअर गेमचे प्रचंड क्रेझ आहे. पबजीने केवळ भारतातच नव्हे तर अवघ्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा गेम खेळणाऱ्या प्रोफेशनल प्लेयर्ससाठी नुकतीच पबजी नेशन्स कप ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध देशांच्या अव्वल संघांनी या स्पर्धेत वर्ल्ड चॅंपियन बनण्यासाठी आपआपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले.


तीन दिवस ही स्पर्धा दक्षिण कोरियाच्या सियोल शहरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेची सुरूवात नऊ ऑगस्ट रोजी झाल्यानंतर, रशियाचा संघ तीन दिवसांच्या या स्पर्धेत पहिल्या दोन दिवसांत टॉप-2मध्ये देखील स्थान मिळवण्यात अपयशी ठरला होता. दक्षिण कोरियाच्या संघाचे पहिल्या दोन्ही दिवसांवर वर्चस्व होते. पण, रशियाने तिसऱ्या आणि अंतिम दिवशी जोरदार मुसंडी मारली आणि दक्षिण कोरियाला मागे टाकत रशियाने थेट अव्वल स्थान गाठले. त्याचबरोबर रशिया पबजी गेममधील पहिला वर्ल्ड चँपियन ठरला.

दक्षिण कोरियाचा संघ अंतिम दिवशी देखील पहिल्या दोन फेऱ्यांनंतर आघाडीवर होता. पण स्पर्धेचे सगळे चित्र अखेरच्या तीन फेऱ्यांनी बदलले, दक्षिण कोरियाच्या संघाला अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये केवळ सात गुण मिळाले आणि दुसऱ्या स्थानावर त्यांची घसरण झाली. 127 पॉइंट्स पहिल्या क्रमांकावरील रशियाला मिळाले, तर दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण कोरियाला 123 पॉइंट्सवरच समाधान मानावे लागले. कॅनडाने 106 पॉइंट्स मिळवून तिसरा क्रमांक गाठला. यानंतर चौथ्या ते दहाव्या क्रमांकावर अनुक्रमे व्हिएतनाम, जर्मनी, थायलंड, चीनी तैपेई, चीन, अर्जेंटीना आणि युएसए या देशांचा क्रमांक आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातील 16 देशांनी सहभाग नोंदवला आणि विजेत्याला तब्बल 500,000 डॉलर बक्षीस म्हणून देण्यात आले.

Leave a Comment