पूरग्रस्तांसाठी ‘लालबागचा राजा’ची २५ लाखांची मदत


देशभरासह राज्यातील अनेक ठिकाणाहून महापुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासाठी अनेक संस्था, संघटना तसेच गणेश मंडळे पुढे येऊ लागले आहेत. त्यातच आता मुंबईतील नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पूरग्रस्तांसाठी २५ लाख, तर चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाने ५ लाखांची मदत केली आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुराचा फटका बसला. आपले संसार लोकांना उघड्यावर टाकून मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. जीवितहानीसह प्रचंड आर्थिक हानी या विध्वंसात झाली आहे. दरम्यान, पूर ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर राज्यभरातून नागरिक, संस्था, संघटना वेगवेगळ्या माध्यमातून मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

तर दुसरीकडे सजावटीवरील अनावश्यक खर्चाला कात्री लावून मुंबईतील गणेश मंडळांनी पूरग्रस्तांना मदत द्यावी, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले होते. लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेश मंडळांनी त्याला प्रतिसाद दिला. लालबागचा राजा मंडळाने २५ लाख रूपये दिले आहेत. तसेच एका गावाचे पुनर्वसनही मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने प्रशासनाची मदत घेऊन पुनर्वसनाचे काम केले जाणार आहे.

५ लाख चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाने रूपये दिले आहेत. मुख्यमंत्री निधीत ही रक्कम जमा केली जाणार आहे. मदत देणाऱ्या संस्था, संघटनांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवर जाहीर केली आहेत. यात एक लाखांपासून एक कोटींपर्यंत मदत करणाऱ्यांची नावे निधीसह ही नावे दिली आहेत.

Leave a Comment