हार्ड कौरची मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह ट्विट, ट्विटरने संस्पेंड केले अकाउंट


आधी सरसंघचालक मोहन भागवत नंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी अपशब्द वापरल्याप्रकरणी प्रसिद्ध रॅपर हार्ड कौरचे ट्विटर अकाउंट संस्पेंड करण्यात आले आहे. नुकताच आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ हार्ड कौरने पोस्ट केला होता. ज्यात ती मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल अपशब्द वापरताना दिसत होती. ती यात खालिस्तानी समर्थकांसोबत उभी असून हे सर्वजण खालिस्तान चळवळीवर बोलताना दिसत आहेत.

हार्ड कौरने 2 मिनिटे 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना चॅलेंज केले आहे. तिने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर ट्रेंडमध्ये आल्यानंतर आपल्या आगामी गाण्याची प्रमोशन क्लिपसुद्धा हार्ड कौरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. ती ज्यात याच खालिस्तानी समर्थकांसोबत दिसत आहे. काही शीख समुह बऱ्याच काळापासून एका वेगळ्या देशाची म्हणजेच खालिस्तानची मागणी करत आहेत.

हार्ड कौरवर याआधी जून महिन्यातही देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता. कारण तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर गंभीर आरोप करत वाईट कमेंट केल्या होत्या. तसेच त्यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिलेल्या होत्या. त्यामुळे तिच्यावर आयपीसी कलम 124 A, 153A, 500, 505 आणि 66 IT कायद्यानुसार केस दाखल करण्यात आली होती.