विंगकमांडर अभिनंदन यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने होणार सन्मान


पुलवामा हल्ल्याचा बदला घेताना पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचा येत्या स्वातंत्र्य दिनी वीरचक्र पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन अभिनंदन यांना हा पुरस्कार देणार असल्याची चर्चा सुरू होती. वीर चक्र हा भारताचा तिसरा सर्वात मोठा युध्दकाळात केलेल्या कामगिरीसाठी देण्यात येणारा पुरस्कार आहे. पहिल्या क्रमांकावर परमवीर चक्र तर दुसऱ्या क्रमांकावर महावीर चक्र पुरस्कार आहे.

अभिनंदन यांच्याबरोबरच हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युध्दसेवा मेडल देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यांना हे मेडल 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्या हवाईदलातील डॉग फाइटमध्ये चांगल्या रितीने फ्लाइट कंट्रोलरचे कार्य केल्याने देण्यात येणार आहे.

पुलवामा येथे करण्यात आलेल्या आंकदवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी, भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केले होते. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने हल्ला केला होता. यामध्ये 300 दहशतवादी मारले गेले होते.

भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी भारतात प्रवेश केला होता. मात्र भारतीय हवाई दलाच्या विमानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

अभिनंदन यांनी मिग-21 बाइसनद्वारे पाकिस्तानचे एफ-16 हे लढाऊ विमान पाडले होते. अभिनंदन यांनी एफ-16 ला पाडताच त्यांचे विमान देखील कोसळले. त्यामुळे त्यांना देखील विमानातून उडी मारावी लागली होती व ते चुकीने पाकिस्तानच्या भागात उतरले. त्यानंतर त्यांना पाकिस्तान सैन्याने पकडले होते. मात्र 60 तासाच्या आतच आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने 1 मार्चला त्यांना भारताच्या ताब्यात दिले.

Leave a Comment