वर्षातून रक्षाबंधनादिवशी एकदाच उघडते वंशीनारायण मंदिर


भारतात अनेक मंदिरे आहेत आणि बहुतेक मंदिरातून वर्षभर पूजाअर्चना सुरु असते. रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त एक दिवस माणूस पूजा करू शकतो असे एक मंदिर उत्तराखंड राज्यात बद्रीनाथ जवळच्या उर्गम घाटी येथे आहे. याला वंशी नारायण किंवा बन्सी नारायण मंदिर म्हटले जाते. वर्षातले ३६४ दिवस हे मंदिर बंद असते. राखी जशी भावाला बांधली जाते तशी ती रक्षणकर्त्यालाही बांधली जाते. ईश्वर साऱ्या सृष्टीच्या रक्षणकर्ता आहे या भावनेतून या विष्णू मंदिरात विष्णूला राखी बांधण्याची परंपरा आहे म्हणून हे एकाच दिवस हे मंदिर उघडले जाते.

हिमालय पर्वतरांगात १३ हजार फुट उंचीवर हे मंदिर असून तेथे जाण्यासाठी ७ किमी पायी चालावे लागते. राखीपौर्णिमेदिवशी हे मंदिर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उघडे असते आणि उर्गम घाटीतील महिला मुली खडतर रस्ता पार करून देवाला राखी बांधण्यासाठी येतात. या एकाच दिवशी येथे माणसाच्या हातून पूजा होते.

या मंदिराचा संबंध बळीराजा आणि विष्णू वामनअवताराशी आहे. भगवान विष्णूने बळीला वामन अवतार घेऊन पाताळात ढकलले आणि त्याची भक्ती पाहून बळीने विष्णूने त्याचा द्वारपाल म्हणून राहावे अशी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण केली. तेव्हा लक्ष्मीने बळीला राखी बांधून त्या बदल्यात विष्णूची पाताळातून सुटका केली अशी कथा आहे. लक्ष्मीला पाताळ रस्ता माहिती नव्हता म्हणून नारद तिच्यासोबत गेले. वंशी नारायण मंदिरात वर्षभर नारद पूजा करतात असे मानले जाते. लक्ष्मीसोबत गेल्याने तो एक दिवस या मंदिरात तेथील पुजाऱ्याने पूजा केली तेव्हापासून रक्षाबंधनाचा एकच दिवस हे मंदिर उघडले जाते.

कत्युरी शैलीत बांधले गेलेल्या या मंदिरात विष्णूची चतुर्भुज मूर्ती असून गणेश व वन्यदेवतांच्या मुर्तीही आहेत.

Leave a Comment