
नवी दिल्ली – १५ ऑगस्टला श्रीनगर येथील लाल चौकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तिरंगा फडकवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या बाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. हे पाऊल त्यांनी उचलले तर ते आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. शहा जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवल्यानंतर आता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी पोहोचू शकतात.
श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार अमित शहा ?
सध्या काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तळ ठोकून आहेत. शहा यांच्या दौऱ्याची १५ ऑगस्टला शक्यता लक्षात घेऊन येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दोन केंद्र शासित प्रदेशात जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन केल्यानंतर अमित शहा यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. पण, भारत-पाकिस्तानदरम्यानचा तणाव आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर कोणतीच अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.
याआधी भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह नरेंद्र मोदींनी १९९२ मध्ये लाल चौकात तिरंगा फडकवला होता. पाकिस्तानकडून हल्ल्याचा तसेच, दहशतवाद्यांचा धोका असतानाही त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ध्वजारोहण केले होते. कलम ३७० हटवल्यानंतर काय परिस्थिती आहे याचा आढावाही घेण्यात येत आहे.
