भारतासाठी मोटरस्पोर्ट्समध्ये विश्वचषक जिंकणारी देशातील पहिलीच महिला


दुबई : आपल्या देशातील खेळाडू मोटरस्पोर्ट्स सारख्या खेळात कमीच दिसतात. भारताच्या 23 वर्षीय महिला खेळाडूने या क्रीडा प्रकारात विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. मोटस्पोर्ट्सचा विश्वचषक बेंगळुरूच्या ऐश्वर्या पिस्सायने जिंकून ती अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

2017 मध्ये झालेल्या अपघातातून ऐश्वर्याने स्वतःला सावरत ही कामगिरी नोंदवली आहे. या प्रकारात भारताला विजेतेपद मिळवून देणे अभिमानास्पद असल्याचे ऐश्वर्या म्हणाली. ज्यूनिअर कॅटेगरीत तिने दुसरे स्थान पटकावले होते. FIM विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी ऐश्वर्या पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. तिने दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत बाजी मारली होती. पोर्तुगालमध्ये तिसऱ्या, स्पेनमध्ये पाचव्या, हंगेरीत चौथे स्थान पटकावलेल्या ऐश्वर्याने स्पर्धेत 65 गुणांची कमाई केली.


ऐश्वर्या आणि व्हिएरा यांच्यात हंगेरीत सहभागी होण्यापूर्वी चुरस रंगली होती. ऐश्वर्याने हंगेरीत 13 गुण मिळवले तर व्हिएराने 16 गुण मिळवले. पण, आधीच्या टप्प्यात मिळवलेल्या गुणांच्या जोरावर ऐश्वर्यांने बाजी मारली. दोन मोठ्या अपघातातून बचावलेल्या ऐश्वर्याने जबरदस्त पुनरागमन केले. तिची सर्जरी झाली होती. जवळपास दोन महिने रुग्णालयात रहावे लागलेल्या ऐश्वर्याच्या कॉलरबोन तुटले होते. स्टीलची प्लेट आणि सात स्क्रू ते जोडण्यासाठी लावण्यात आले होते.