आधारकार्ड, पासपोर्ट दाखवून गाय घेता येणार दत्तक


दिल्लीच्या मयूर विहार फेज १ मधील गोशाळेत गाय मोफत दत्तक दिली जात असून राधाकृष्ण मंदिरातील महंत बाबा मंगलदास गेली १२ वर्षे ही मोहीम राबवीत आहेत. येथे असलेल्या सुमारे ३१०० गायीची काळजी हा आश्रम गेली अनेक वर्षे अतिशय आस्थेने घेत असून आजही येथे गायीची देखभाल अतिशय मनापासून केली जाते.

महंत बाबा मंगलदास ज्यांना गाय पाळायची असेल त्यांना गाई दत्तक म्हणूनही देतात. मात्र गाय दत्तक देताना ज्याला गाय हवी त्याची सर्व माहिती खासगी गुप्तहेराकडून काढली जाते. महंत सांगतात आम्ही ही माहिती, ज्याला गाय दत्तक हवी तो खरा प्राणीप्रेमी आहे काय, घेतलेल्या गाईची सर्व देखभाल तो चांगली करेल का हे तपासण्यासाठी गोळा करतो. गाय दत्तक घेणारयाने गाय आजारी झाली अथवा मरण पावली तर त्याची माहिती मठाला देण्यासाठी एक बॉंड द्यायचा असतो. आत्तापर्यत या गोशालेतून ३२ गाई दत्तक दिल्या गेल्या आहेत. गाय दत्तक घेणाऱ्याला पासपोर्ट, अथवा आधार कार्डची कॉपी द्यावी लागते.

या गोशाळेत ३१०० गाई असून त्याची देखभाल, चारापाणी यासाठी महिना ५० हजार रुपये खर्च येतो. हा खर्च डोईजड असून चाऱ्यासाठी कर्ज घ्यावे लागते. या गोशाळेत ३२ विविध जातीच्या गाई आहेत. त्यात कपिला, मयूरपंखी, हरयानवी, देवळी, माळवी, मेवाती, नागौरी, सिंधी, पहाडी अश्या अनेक जाती आहेत. त्यातील काही अगदी दुर्मिळ आहेत.

Leave a Comment