जागेश्वर धाममध्ये बाल, तरुण रुपात होते शिवाची पूजा


देवभूमी उत्तराखंडच्या अलमोडा भागात पुराणात वर्णन असलेले जागेश्वर धाम नावाचे पवित्र स्थळ असून येथे श्रावणात मोठी यात्रा भरते. या देवस्थानाचे उल्लेख स्कंदपुराण, शिवपुराण, लिंगपुराणात आढळतात. या ठिकाणी १२४ लहान मोठी मंदिरे असून ती केदारनाथ शैलीत बांधली गेली आहेत. ही मंदिरे २५०० वर्षापूर्वीची असावीत असा अंदाज आहे. प्राचीन काळी ही शिवाची तपोभूमी होती असे सांगितले जाते. या मंदिर समूहाजवळ छोटी नदी असून तेथे सप्तऋषींनी तपस्या केली होती आणि येथूनच शिवाची शिवलिंग स्वरुपात पूजा केली जाऊ लागली असे सांगितले जाते.


या मंदिरात शिवाची पूजा बाल अथवा तरुण स्वरुपात केली जाते. या सर्व मंदिरांची निर्मिती प्रचंड मोठ्या शिलांमधून केली गेली आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या जुन्या मार्गावर ही मंदिरे आहेत. आदि शंकराचार्य केदारनाथला गेले तेव्हा प्रथम येथे आले, दर्शन घेतले आणि पुढे गेले असे सांगितले जाते. त्यांनी येथील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरातील पाषाण मूर्ती, शिल्पकला हे प्रमुख आकर्षण असून त्या मंदिरात महामृत्युंजय मंदिर सर्वात जुने आहे तर दंडेश्वर मंदिर सर्वात मोठे आहे. येथे भैरव, पार्वती, केदारनाथ, हनुमान, दुर्गा मंदिरे आहेत.

Leave a Comment